धाराशिव: एकेकाळी नावाजलेले धाराशिवचे आयुर्वेदिक महाविद्यालय आज वाऱ्यावर सोडल्यासारखे वाटत आहे. डीन गंगासागरे यांच्या बेफिकीर कारभारामुळे महाविद्यालय आणि हॉस्पिटलची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. अत्याधुनिक उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी आता प्राथमिक सुविधाही मिळणे कठीण झाले आहे.
डीन साहेब मात्र एसीच्या गारव्यात रमले असले तरी, रुग्ण व विद्यार्थी मात्र उन्हात तडफडत आहेत. महाविद्यालयात आवश्यक मनुष्यबळ नाही, तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, तर डीन साहेबांनी मनुष्यबळ वाढवण्याचा कोणताही प्रस्तावही गेल्या अनेक वर्षांत दिलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे.
वनौषधी उद्यानाचीही गंगासागरेंनी वाट लावली
1986 मध्ये स्थापनेपासून नावाजलेले वनौषधी उद्यान हे या महाविद्यालयाचा एक मोठा ठेवा होता. मात्र, सध्या या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. दुर्लक्षामुळे औषधी वनस्पती नष्ट होत आहेत, देखभाल दुरुस्तीला कोणी वाली नाही, आणि विद्यमान डीन गंगासागरे यांच्या काळात या उद्यानाची अवस्था बकाल झाली आहे. हे उद्यान पूर्वी संशोधन व आयुर्वेदिक उपचारांसाठी मोठे साधन होते, मात्र आता ते अस्तित्वाच्या उंबरठ्यावर आहे.
पंचकर्म विभाग – उपचार कमी, समस्या जास्त
महाविद्यालयातील पंचकर्म विभागाची अवस्था सध्या ‘सलाईनवर’ आहे. येथे केवळ एकच कर्मचारी असून, त्यांना कोणतेही प्रशिक्षण नाही. अनुभवाच्या भरवशावर उपचार सुरू आहेत. स्त्री विभागात तर परिस्थिती अधिक गंभीर आहे, कारण तेथे रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांवर उपचारांची जबाबदारी टाकली गेली आहे. रुग्णांच्या म्हणण्यानुसार, “त्या फक्त तेल लावतात.”
गंगासागरे ‘गंगा’त हात धुवून घेतायत?
महाराष्ट्रात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांची संख्या मर्यादित असताना, धाराशिवचे हे महाविद्यालय पूर्वी प्रतिष्ठित होते. मात्र, डीन गंगासागरे यांच्या निष्क्रियतेमुळे आता हे संस्थान संकटात आले आहे. पंचकर्म विभाग, हॉस्पिटल आणि वनौषधी उद्यान यांची दुरवस्था झाली असून, व्यवस्थापनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.
आता प्रश्न असा आहे की, गंगासागरे यांनी महाविद्यालय उभारीसाठी पावले उचलणार की ‘बहती गंगा में हाथ धुवून’ स्वतःची सुटका करून घेणार?