दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सोलापूर-हुमनाबाद चार पदरी रस्त्याच्या कामाचा आजही काही भाग रखडलेलाच! अणदूर ते जळकोट हा रस्ता आणि उड्डाण पूल दलाली करणाऱ्या पुढाऱ्यांच्या ‘खेळां’मुळे कधी पूर्ण होणार, याचा पत्ता नाही.
याच दलालीच्या खेळामुळे तीन कंत्राटदार पळून गेले, मात्र याची किंमत सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थी भरत आहेत. नळदुर्ग बायपास एकेरी मार्गाने उघडला असला, तरी अणदूर उड्डाण पुलाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. कारण एकच – अणदूरमधील आका आणि आकाचा बोका!
कंत्राटदार पळाले, पण लोकांचा आक्रोश कुठे जाईल?
या ‘आका’ मंडळींनी कंत्राटदारांकडून टक्केवारी मागून त्यांना हैराण केले. शेवटी कंत्राटदारांनी त्रास सहन करण्यापेक्षा पळ काढला. परिणामी, अणदूर उड्डाण पुलाचे काम अर्धवट पडले आहे, ज्यामुळे जवाहर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सोलापूरहून नळदुर्गकडे जाणाऱ्या बसेस थेट बसस्थानकात येत नाहीत, त्यामुळे प्रवाशांना विरुद्ध दिशेला जाऊन बसची वाट पाहावी लागते. हा प्रकार अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून अनेक निष्पाप नागरिक त्यात बळी पडले आहेत.
नळदुर्ग बायपास पूर्ण कधी? नाही माहित!
अर्धवट बायपासमुळे नळदुर्ग शहर अपघातांचे केंद्र बनले आहे. अपुऱ्या नियोजनामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.
मृत्यूचा महामार्ग! जबाबदार कोण?
अणदूर ते जळकोट हा मार्ग मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वर्षाला किमान १०० अपघात आणि ५० हून अधिक मृत्यू ही या मार्गाची कटू वास्तवता आहे. अनेक अपघातांमध्ये लोक अपंग झाले, तर अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली.
जनतेचा प्रश्न: ‘आका’ आणि ‘आकाचा बोका’ यांना लगाम कोण घालणार?
सवाल हा आहे की, हे सगळं थांबवणार कोण? दलाली, टक्केवारीच्या राजकारणात लोकांचे जीव जात असतील, तर या पुढाऱ्यांवर कारवाई कधी होणार? की लोकांनीच आता रस्त्यावर उतरून उत्तर मागायचं?