तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणावरून मोठे गदारोळ माजले असतानाच, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपीन शिंदे आणि डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यात ‘वादसंवादाची’ विशेष झलक अनुभवायला मिळाली. पोलिसांनी ‘आजवर कुणाची तक्रार नाही’ असे म्हणत कसं मस्त हात झटकले होते, पण आता सगळ्यांचा ‘ड्रग्ज झोन’ समोर येत आहे.
रवींद्र साळूंके आणि सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ माने यांनी पोलिसांना धडधडीत पुरावे देऊनसुद्धा, पोलिसांनी काहीच हालचाल केली नाही. एवढंच नव्हे तर, अवैध धंद्यांची माहिती मिळूनही कार्यवाही शून्य! कारण काय? अहो, माफियांवर पोलिसांचा धाक बसण्याऐवजी, माफियांनीच तक्रारदारांवर दबाव टाकायला सुरुवात केलीय!
असली गंमत तर इथेच आहे – हे सर्व माफिया एका नामांकित राजकीय नेत्याचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातंय. आणि नेत्याचं प्रेम एवढं उदंड की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त या माफियांनी मोठ्या वृत्तपत्रात शुभेच्छा जाहिरात देऊन, थेट बरोबरीच्या फोटोंसह नाते सांगितलं! आता तुम्हीच सांगा, माफियांनी ‘हॅप्पी बर्थडे’ म्हटलं की त्यांना काही होणार आहे का?
पालकमंत्र्यांनी ‘७२ तासांत कार्यवाही’ असा शिट्टी वाजवली खरी, पण पोलिसांनी कोणालाच अटक केली नाही. एक महिला मात्र तामलवाडी पोलिसांच्या तावडीत सापडली – म्हणजे ‘ड्रग्जचा बॉस’ नव्हे, तर कोणीतरी ‘बळीचा बकरा’! बाकी सगळे मोकाट मोकाट…
तुळजापूरमध्ये आता ‘चौकशीचे नाटक’ सुरू आहे, आणि जनतेचा विश्वास मात्र ‘फुल टॉस’ वर झेल गमावल्यासारखा गायब झालाय. ड्रग्जमुक्त तुळजापूर होणार की ड्रग्जवाल्यांना संरक्षण देणाऱ्या ‘व्हीआयपी झोन’मध्येच राहणार, हे पाहणं आता मनोरंजक ठरेल!