धाराशिव जिल्ह्यात नवा जिल्हाधिकारी आला की भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पोटदुखी सुरू होते, हा नियमच आहे. पण यावेळी तर परिस्थिती गंभीर! कीर्ती किरण पुजार यांनी आजच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आणि महसूल विभागात धडकी भरली.
पदभार स्वीकारण्याआधीच जिल्हाधिकारी महोदयांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले, पण त्यांचा खरा आशीर्वाद भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोप बनून कोसळतो की काय, अशी भीती महसूल विभागात पसरली आहे. गेल्या अडीच वर्षात जे काही “हातसफाईचे प्रयोग” झाले, त्याचा हिशोब मागितला तर काय करायचं, या विचाराने बऱ्याच जणांच्या हातातून चहा-गुटखा गळून पडतोय.
तहसील कार्यालयाचा मेकओव्हर!
आता स्थिती अशी आहे की जिल्हाधिकारी पुजार आज दुपारी दोन वाजता पुन्हा तुळजापूर तहसील कार्यालयाला भेट देणार, हे ऐकताच तहसील कार्यालयाची ‘डेकोरेशन’ सुरू झाली. जेथे पाहावं तेथे गुटख्याच्या पुड्या, भिंतींवरील ‘तंबाखूच्या आर्टवर्क’, वॉशरूममध्ये “साठवलेले सोनं” – या सगळ्याची आता झाडलोट होतेय. सकाळपासून बरीच अधिकारीमंडळी हातात झाडू, वाळू आणि साबण घेऊन लागली आहेत. कोणत्याही क्षणी ‘स्वच्छता मोहीम 2.0’ सुरू होईल अशी स्थिती आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांना ‘सिंदफळ’!
पण फक्त स्वच्छता पुरेशी नाही. तुळजापूर तहसील कार्यालयात झालेल्या बोगस एनए ले-आऊट आणि गुंठेवारीच्या फाईलींचा पंचनामा कधी होणार? भ्रष्टाचाराची दारं उघडली की अनेक ‘फाईलधारी’ लोकांची झोप उडेल. सिंदफळ प्रकरणात गुन्हा दाखल असला तरी पुढे काहीच झालं नाही, हे जिल्हाधिकारी लक्षात घेणार का?
जिल्हाधिकारी पुजार जिल्ह्याचा कारभार ‘स्वच्छ’ करतील का, याकडे साऱ्या धाराशिवच्या प्रामाणिक लोकांचे डोळे लागले आहेत. मात्र, महसूल विभागातील काही जणांची मात्र हृदयाची धडधड वाढली आहे.
बघूया, हा नवा जिल्हाधिकारी “भ्रष्टाचार हटाव” अभियान यशस्वी करतो की “फाईल लावून” शांत बसतो!