धाराशिव – तालुक्यातील ढोकी येथील एका संशयित बर्ड फ्लू रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव यांनी ढोकी येथील एका संशयित बर्ड फ्लू रुग्णाच्या घशातील व नाकातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे येथे पाठवले होते. 4 मार्च 2024 रोजी आरोग्य विभागाला तपासणी अहवाल प्राप्त झाला, आणि त्यामध्ये निष्कर्ष नकारात्मक (Ve) आले आहेत.
आरोग्य विभागामार्फत ढोकी गावाच्या 10 किलोमीटर परिघातील 22 गावांमध्ये फ्लू सारख्या आजारांसाठी (SARI/Influenza Like Illness – ILI) सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात आजपर्यंत नवीन कोणताही संशयित रुग्ण आढळलेला नाही.
आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांनी मिळून ढोकी आणि जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धाराशिव आणि डॉ. एस.एल. हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.