बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज , बुधवार, ५ मार्च रोजी धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकल धाराशिव समाजाच्या पुढाकाराने हा बंद पुकारण्यात आला असून, जिल्हा व्यापारी महासंघानेही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो वृत्तवाहिन्या, न्यूज वेबसाइट आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. फोटो पाहून अनेक लोक संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत आणि या राक्षसी कृत्याचा निषेध करीत आहेत.
दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठा बंद राहणार
बंदला प्रतिसाद देत जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवावीत, असे आवाहन व्यापारी महासंघाने केले आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये, मेडिकल दुकाने, रुग्णालये, बस सेवा आणि पेट्रोल पंप यांना बंदमधून वगळण्यात आले आहे.
सर्व आरोपींना फाशीची मागणी
या हत्याकांडाच्या निषेधार्थ सर्व आरोपींना फाशी द्यावी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, बंदला व्यापारी आणि नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
बंद शांततेत पार पडावा आणि कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास होऊ नये, याची खबरदारी आयोजकांकडून घेतली जाणार आहे, असे जिल्हा व्यापारी महासंघाने स्पष्ट केले आहे.
हे वाचा
क्रौर्याच्या छायेत: एक खून, एक राजीनामा, आणि एक बेफिकीर व्यवस्था …