धाराशिव – उपळा (मा.) येथील उपळे रयत शिक्षण संस्थेच्या हरिभाऊ घोगरे शाळेच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संस्थेची आणखी एक शाखा कोंड येथे असून, त्याचे परीक्षा केंद्र तेर येथे आहे. मात्र, या संस्थेत शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा व्यवस्थापनाची चमकोगिरी करणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे आरोप होत आहेत.
शिक्षकांचे कामकाज आणि व्यवस्थापनाच्या भूमिका संशयास्पद?
या संस्थेत वर्षभर शिक्षणाच्या नावाखाली काहीच ठोस काम केले जात नाही, मात्र पगार मात्र नियमित काढला जातो. शाळा सुरू होताना जून-जुलै महिन्यात विद्यार्थ्यांना दाखल करण्यासाठी धडपड, वर्षभर निष्क्रियता आणि परीक्षेच्या वेळी तोंडी उत्तरांच्या माध्यमातून निकाल सुधारण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप आहे.संस्थेतील शिक्षणाच्या गोंधळावर चौकशी होण्याची गरज आहे, असे स्थानिकांनी मत व्यक्त केले आहे.
शासनाच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार?
संस्थाचालकांनी शासन नियम डावलून मागासवर्गीय आरक्षित पदावर ओपन प्रवर्गातील शिपाईची नियुक्ती केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, शासनाने शिपाई भरती बंद असताना लाखो रुपयांची देवाणघेवाण करून पदे विकण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद?
संस्थाचालकांचे कुटुंबीय प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसताना, त्यांचे पगार दरमहा नियमित काढले जात असल्याचे आरोप झाले आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही स्थिती बघूनही दुर्लक्ष का केले?, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
टीईटी अपात्रांना भरती, पात्र उमेदवार प्रतीक्षा यादीत?
माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अनेक संस्थांमध्ये व्यवस्थापनाच्या नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तेही विद्यार्थ्यांची संख्या नसताना आणि खोटे वेळापत्रक दाखल करून. यामुळे, टीईटी पात्र असलेले उमेदवार प्रतीक्षा यादीत राहिले आणि अपात्र उमेदवारांना भरती करण्यात आले, असा गंभीर आरोप केला जात आहे.
चौकशी आणि कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होत आहे. शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळेतील कारभार, शिक्षकांची चमकोगिरी आणि शासनभरतीतील गैरव्यवहार यावर प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर हा भ्रष्टाचार अधिकच माजेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
(या प्रकरणाचा पुढील तपशील लवकरच…)