तुळजापूर – तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला मंदिरात चोरीचा फटका बसला आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ५५,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी फिर्यादी श्रीराम भरत मोरे (वय ३०, रा. निजामाबाद, सध्या मुक्काम पुणे) यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ८ मार्च) दुपारी १.४५ वाजता श्रीराम मोरे हे आपल्या कुटुंबीयांसह श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. मंदिरात होम दर्शन घेत असताना त्यांच्या पत्नीच्या पर्समधून ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि रोख १,००० रुपये असा एकूण ५५,००० रुपयांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने चोरून नेला.
या प्रकरणी श्रीराम मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.