धाराशिव – शहरातील साळुंखे नगर आणि बालाजी नगर परिसरातून गेलेल्या 33 के.व्ही. वीजवाहिनीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, काही जण अपंगही झाले आहेत. या लाईनच्या देखभालीकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माजी सैनिक संजयकुमार काटे यांचा शॉक लागून मृत्यू
२४ फेब्रुवारी रोजी माजी सैनिक संजयकुमार रामहरी काटे( वय ५० ) यांचा या धोकादायक 33 के.व्ही. लाईनला शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंब रस्त्यावर आले असून, त्याच्या जबाबदारीबाबत महावितरणला जबाबदार धरले जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लाईनची देखभाल नाही; जीव धोक्यात
स्व. संजयकुमार रामहरी काटे यांचे पुतणे आणि स्थानिक रहिवासी आबासाहेब काटे यांनी आ. कैलास पाटील यांना निवेदन देत या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत या लाईनमुळे अनेक जण मृत्युमुखी पडले किंवा अपंग झाले आहेत. तरीही महावितरण कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नागरिकांनी उठवली कारवाईची मागणी
या धोकादायक लाईनचे योग्य देखभाल-दुरुस्ती आणि संभाव्य धोक्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा यास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि पीडित कुटुंबांना भरपाई द्यावी, अशीही मागणी केली जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि महावितरणने तातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.