‘छावा’ चित्रपटानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात इतिहासाची धग जागवली आणि औरंगजेब नावाचं पाच अक्षरी भूत चर्चेत आलं. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातलं हे नाव मराठी माणसाच्या स्मृतीत कायम कोरलं गेलंय—कारण याच क्रूर सत्ताधीशाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून ठार मारलं. पण हा इतिहास फक्त क्रौर्याचा नव्हे, तर मराठ्यांच्या बाणेदार पराक्रमाचाही आहे.
औरंग्याची ‘सत्ता’ आणि मराठ्यांची ‘संपत्ती’
औरंगजेबाच्या सत्तापिपासू मनोवृत्तीमुळे त्याने आयुष्यभर रक्तरंजित मोहिमा केल्या. दिल्लीच्या तख्तावर बसायला त्याने 40 वर्षं संघर्ष केला, पण सिंहासनावर बसल्यावरही चैन नव्हती. दक्षिणेत मराठ्यांना संपवण्याच्या नादात तब्बल 26 वर्षं तंबूत काढावी लागली. मराठा पराक्रमानं त्याच्या मुघल सल्तनतीला सळो की पळो करून सोडलं. अखेर, मराठ्यांच्या गनिमी काव्यानं पुरता शिणून आणि खचून भिंगारजवळ त्याचा अंत झाला.
कबर उखडायची की इतिहासाचं स्मारक उभारायचं?
आजही औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या खुलताबाद येथे आहे आणि तीच राजकीय धग पुन्हा तापतेय. काही लोक ती उखडायला सांगतात, काही जतन करायला सांगतात. पण खरी गोष्ट काय?
कबर उखडून काय साध्य होणार? जो माणूस मराठ्यांच्या पराक्रमाने गारद झाला, त्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिटवण्यापेक्षा त्याच जागी छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, संताजी-धनाजी यांच्या विजयाची गाथा कोरली तर?
पराक्रमाची स्मारकं – महाराष्ट्रधर्म जपूया!
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर आहे, कारण ती मराठ्यांच्या पराक्रमाची खूण आहे. ती नष्ट केली असती, तर आज आपण शिवरायांच्या त्या युद्धनीतीचा अभिमानानं उल्लेखही केला नसता. म्हणूनच, औरंगजेबाच्या कबराचं काय करायचं याचा निर्णय तात्काळ भावनेच्या भरात नाही, तर दूरदृष्टी ठेवून व्हायला हवा.
त्या जागी एक भव्य स्मारक उभारा! जे जगाला सांगेल – जो मराठ्यांशी नडला, त्याचा अस्त निश्चय आहे! मराठ्यांच्या तलवारीने जोपर्यंत पराक्रम गाजवला, तोपर्यंतच भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं!
डोकं भडकवू नका, डोकं चालवा!
इतिहासाचं स्मारक राखायचं की तोडायचं हे ठरवताना मराठी माणसांनी भावनेच्या आहारी न जाता विचार करायला हवा. मराठा पराक्रम कधीही इतिहासाच्या पानांत गडप होऊ नये, यासाठी त्याचा ठसा उभा करायचा!
“Never Outsource Your Thought Process!” – आपला विचार स्वतः करा, फक्त भडकू नका, भान ठेवा!
तुम्हाला काय वाटतं ? आम्हाला नक्की कळवा…
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह – मो. 7387994411