धाराशिवच्या पत्रकारितेचा आवाज दडपायचा खेळ काही नवीन नाही. पण ज्यांनी या व्यवसायाला बदनाम करण्याचा विडा उचलला आहे, त्यांचा खरा चेहरा वेळोवेळी समोर आला आहे. सत्याचा आवाज दडपण्यासाठी बनावट पत्रं, खोटे आरोप आणि षड्यंत्रं केली जात आहेत, पण सत्य कधीच हरत नाही!
खोट्या प्रचाराचा फसलेला कट
आ. सुरेश धस यांच्या जुन्या लेटरहेडवर धाराशिव लाइव्ह आणि सुनील ढेपे यांच्या बदनामीचा मजकूर लिहून तो व्हायरल करण्यात आला. योजना सोपी होती—खोटं पसरवायचं आणि आमचा नाहक अपमान करायचा! पण ज्यांनी हा डाव आखला, तेच सापडले. कारण स्वतः आ. सुरेश धस यांनी हे पत्र आपले नसल्याचे स्पष्ट केले. सहीही बनावट असल्याचे त्यांनी जाहीर सांगितले, आणि कट करणाऱ्यांचे तोंड काळे झाले.
नॉन-क्रिमिलर प्रकरण आणि पुन्हा एकदा तोंडावर आपटलेले षड्यंत्र
याच खोक्याने सोलापूरला बदली झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी धरून आम्हाला वकिलामार्फत नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. कारण काय? आम्ही त्यांचे नॉन-क्रिमिलर सर्टिफिकेट प्रकरण उघडकीस आणले होते! सत्तेचा वापर करून सत्य दडपता येईल, असा या षड्यंत्रकर्त्यांचा अंदाज होता. पण सत्य उघड झाले आणि पुन्हा एकदा हेच लोक उताणे पडले.
२०१६ चे षड्यंत्र – मास्टरमाइंडचा पर्दाफाश!
धाराशिवच्या पत्रकारितेत २०१६ मध्येही अशाच प्रकारची मोठी खेळी झाली होती. त्या वेळीही आमच्यावर खोटे आरोप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सत्य न्यायाच्या कसोटीवर टिकतं आणि खोटं लवकरच गळून पडतं. त्या कटातून आम्ही निर्दोष मुक्त झालो आणि षड्यंत्राचा मास्टरमाइंड पूर्ण उघड पडला.
पत्रकारिता आमच्यासाठी व्यवसाय नाही, जनतेसाठी लढाई आहे!
पत्रकारिता आमच्यासाठी केवळ धंदा नाही, ती जनतेच्या हक्कांसाठी लढण्याची साधना आहे. आम्ही कुणाचा हस्तक होऊन पैसे खाणारे नाही, आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन मैदानात उतरणारे आहोत. सत्य मांडायचं, अन्यायाविरोधात लढायचं, आणि जे चुकीचं आहे त्याला उघड करायचं—हेच आमचे ध्येय आहे.
सत्याच्या मार्गावर श्रीखंडोबाचा आशीर्वाद!
आम्ही श्री खंडोबाचे भक्त आहोत. देवावर आमची श्रद्धा आहे आणि तोच आमच्या सत्याच्या मार्गावर पाठराखण करतो. जे जे आमच्याविरोधात षड्यंत्र करतात, ते शेवटी स्वतःच अडचणीत सापडतात. खोटं कितीही जोरात बोललं तरी ते खरं होत नाही, आणि सत्याला कोणीही हरवू शकत नाही!
सत्य अजिंक्य आहे! षड्यंत्रं कितीही केली, तरी धाराशिवच्या पत्रकारितेचा आवाज दडपता येणार नाही!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह – मो. 7387994411