धाराशिव : तालुक्यातील येडशी येथे इंडस टॉवर कंपनीच्या टॉवरवरून एअरटेल कंपनीच्या इंटरनेटसाठी वापरण्यात येणारे डिश अँटेना व अन्य उपकरणे चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेजोगाई (जि. बीड) येथून एका आरोपीला अटक केली आहे. राजेश आचार्य असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो पूर्वी एका खाजगी कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत संशयित आरोपीचा शोध घेतला. तपासात आंबेजोगाई तालुक्यातील राजेश आचार्य याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
स्वतःच्या फायद्यासाठी उपकरणे चोरी
आरोपी राजेश आचार्य याने नोकरी गेल्यानंतर आर्थिक अडचणीमुळे पैसे कमवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील येडशी, सांजा, मार्डी आणि मसला या ठिकाणी असलेल्या टॉवरवरील इंटरनेटसाठी वापरण्यात येणारी 300 हून अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरल्याची कबुली दिली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी
पोलीस तपासादरम्यान आरोपीच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यात आधीच चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 1,65,000 रुपये किंमतीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (किंमत 70,000 रुपये) असा एकूण 2,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस फौजदार वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, पोलीस नाईक नितीन भोसले आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.