धाराशिव तालुक्यातील दुधगाव ग्रामपंचायतीतील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून केलेला भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या रंगरंगोटीच्या नावाखाली तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांचे बोगस बिल उचलून सरकारी निधीचा गैरवापर करण्यात आला आहे.
रंगरंगोटीची फसवणूक:
दुधगाव जिल्हा परिषद शाळेच्या चार वर्गखोल्यांना २०२३-२४ या कालावधीत रंगरंगोटी आणि डागडुजी केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात एकाही वर्ग खोलीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही, असे मुख्याध्यापकांनी दिलेल्या प्रमाणपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्याध्यापकांचे उघडपणे कबुलीजबाब:
सुरुवातीला सरपंच पतीने मुख्याध्यापकांना धमकावून बोगस प्रमाणपत्र घेतले होते. मात्र, प्रकरणाची चौकशी सुरू होताच मुख्याध्यापकांनी खुलासा केला की, “माझ्या नजरचुकीमुळे आधीचे प्रमाणपत्र चुकीचे दिले होते.” प्रत्यक्षात कोणत्याही वर्गखोलीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही, असे त्यांनी नंतरच्या प्रमाणपत्रात नमूद केले.
ग्रामपंचायतीचा डाव उघडा:
सरकारी निधीचा गैरवापर करण्यासाठी बोगस प्रमाणपत्र तयार करून ग्रामपंचायतीने लाखोंचा घोटाळा उभा केला. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता गावकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.
कागदोपत्री रंगरंगोटी, प्रत्यक्षात भकास शाळा:
सरकारी नोंदीत रंगरंगोटी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले, मात्र शाळेतील वर्गखोल्या आजही मळलेल्या भिंती आहेत. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि ग्रामपंचायतीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
धाराशिवच्या या भ्रष्टाचाराच्या रंगाची पूर्ण चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई होणार का? की सरकारी नोंदीतील रंगरंगोटीचे फसवे रंग असेच कायम राहणार? जनतेचे डोळे प्रशासनाच्या पुढील हालचालीकडे लागले आहेत.











