धाराशिव शहरातील नवतेजस्विनी महोत्सवाचा थाटमाट फसला आहे! नियोजनशून्यपणा आणि प्रभावी प्रसिद्धीचा अभाव यामुळे महोत्सवाला ग्राहकांची पाठ फिरली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित तेजस्विनी महोत्सवात जिल्हाभरातील महिला बचत गटांनी सहभाग घेतला असला तरी विक्रीचा उद्देश पूर्णपणे फसला आहे.
रंगपंचमीचा विचार न केल्याने आयोजनावर पाणी फेरले
धाराशिवात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाजारपेठा बंद असतात, ग्राहक घराबाहेर पडत नाहीत, याची कल्पना असूनही आयोजकांनी हा मुद्दा लक्षात घेतला नाही. सोमवारपासून बुधवारपर्यंत महोत्सवाचे आयोजन केले गेले, परंतु रंगपंचमीच्या दिवशी शहर निर्जन होते. अशा परिस्थितीत ग्राहक स्टॉलवर कसे येणार?
प्रसिद्धीचा फज्जा – ग्राहकांचा शून्य प्रतिसाद
प्रभावी प्रसिद्धी न केल्याने ग्राहकांनी महोत्सवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पहिल्या दिवसापासूनच स्टॉल रिकामे होते, दुसऱ्या दिवशी मोजकेच ग्राहक होते, तर शेवटच्या दिवशी तर तुरळक लोकांनीच हजेरी लावली. महिलांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि उदासीनता स्पष्टपणे दिसत होती.
प्रवासाचा खर्चही निघाला नाही
परंडा, उमरगा यांसारख्या दुर्गम भागांतून आलेल्या बचत गटांच्या महिलांचे प्रवासखर्चही निघाले नाहीत. शेंगदाणा लाडू, पापड, कुरडया, लोणचे, चटणी यांसारख्या वस्तू विक्रीसाठी आणलेल्या होत्या, पण ग्राहकच नव्हते. काही स्टॉलवर नगण्य विक्री झाली असली तरी आर्थिक तोट्यामुळे महिलांच्या तोंडून नाराजीचा सूर उमटला.
आयोजनाची फसगत – जबाबदार कोण?
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जिल्हा समन्वयक आशा कुळकर्णी यांनी रस्त्यावरून प्रसिद्धी केली असल्याचे सांगितले. मात्र, याच कालावधीत योजनांचे निर्देश असल्याने रंगपंचमीचा विचार केला नाही, हे त्यांचे स्पष्टीकरण हास्यास्पद वाटते.
हा महोत्सव आयोजित करण्यासाठी किमान २० ते २५ लाख बजेट असते, हे बजेट कुणाच्या खिशात गेले, याची जोरदार चर्चा सुरु आहे.
महिलांच्या मेहनतीवर पाणी – जबाबदार कोण?
महिला बचत गटांच्या कष्टाने उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हे महोत्सव होते, पण अपयशी नियोजन आणि प्रसिद्धीअभावी मेहनतीवर पाणी फेरले गेले. महिलांनी पुढील वेळी अशा महोत्सवांमध्ये सहभागी होण्यास नकार देण्याची शक्यता आहे.
महोत्सव आयोजनाचा धडा – पुढील वेळी नियोजन हवे
नवतेजस्विनी महोत्सवाच्या अपयशातून धडा घेऊन पुढील वेळी सणवार आणि ग्राहकांच्या उपस्थितीचा नीट विचार करूनच आयोजन करावे लागेल. अन्यथा अशा फसलेल्या आयोजनामुळे महिलांचे मनोबल खचण्याचा धोका आहे.