धाराशिव : तुळजापूर आणि परंडा या दोन शहरांतून उठलेला ड्रग्जचा धुरळा आता राज्याच्या राजकीय मैदानात वादळ ठरला आहे. एका बाजूला ड्रग्जचे पॅकेट उघडताच पोलिसांचे हात हादरले, तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
परंडा ड्रग्ज प्रकरण : प्रमुख आरोपीचा शोध अजूनही अपूर्ण
परंडा ड्रग्ज प्रकरणातील पहिला धक्का बसला तो १९ जानेवारी २०२४ रोजी. पुण्याच्या कोंढव्यात राहणाऱ्या इम्रान नजीर शेखच्या कडून तब्बल ८.३३ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण प्रकरण तिथेच गोठले. मुख्य आरोपीला अटक झाली नाही की, त्याच्या नेटवर्कची पाळेमुळे उधळली नाहीत. उलट, अन्वर उर्फ आण्णा जलील अत्तार या मजुरालाही या प्रकरणात ओढण्यात आले.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण : अजूनही फरारींचा शोध सुरू
दरम्यान, तुळजापूरमध्येही ड्रग्ज प्रकरणाने जोर धरला. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसांनी ४५ ग्रॅम ड्रग्जसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी १० जण गजाआड झाले असले तरी, ६ जण अद्याप फरार आहेत. फरार आरोपींपैकी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत, पण चार आरोपींची नावे अद्यापही गुप्त ठेवली आहेत.
राजकारणात वादळ – केंद्र सरकारकडे तपासाची मागणी
या दोन प्रकरणांच्या तपासाची गती पाहता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत आवाज उठवला आणि केंद्रीय नारकोटिक्स ब्युरोकडून (NCB) तपासाची मागणी केली. गृह मंत्री अमित शहा यांच्याकडे हे प्रकरण वर्ग करण्याचे आवाहन केले आहे.
विधानसभेत वादाची ठिणगी – उत्तर लीकचा फटका
दरम्यान, विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी लक्षवेधी प्रश्न मांडला होता. उत्तर विधानसभेत दिले जाणार होतेच, पण तेवढ्यात धक्का बसला – भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे खासगी स्वीय सहाय्यक उत्तर लीक करत तुळजापूरच्या पत्रकार ग्रुपवर पोस्ट टाकले!
आमदार कैलास पाटील संतापले – “कोण वाचवतंय ड्रग्ज पेडलरला?”
हे लीक प्रकरण समजताच कैलास पाटील संतापले. विधानसभेत गृह विभागावर जोरदार टीका करत त्यांनी थेट प्रश्न उचलला – “ड्रग्ज पेडलरला कोण वाचवत आहे? कुणाचा आशीर्वाद आहे?”
राजकारणाच्या वावटळीत ड्रग्ज प्रकरण गडबडले
ड्रग्ज प्रकरणाच्या या नाट्यात न्यायालयीन प्रक्रियांचा गोंधळ, राजकीय नेत्यांची गरळ आणि पोलिसांची ढिलाई हे सर्व एकत्र गुंफले गेले आहेत. तुळजापूर आणि परंड्याच्या ड्रग्ज कांडामुळे फक्त नशेची नळीच नव्हे तर राजकीय कुरघोडीचीही चर्चा रंगली आहे.
ड्रग्जचा मुळापर्यंत जाणार की फक्त राजकारणाचे नाट्य?
आता प्रश्न असा आहे की, हे प्रकरण ड्रग्जच्या मुळापर्यंत पोहोचेल का? की फक्त राजकारणाच्या गर्दीत हरवून जाईल? तपास कोण करेल? जबाबदारी कोणाची? आणि ड्रग्ज पेडलरचा खरा आशीर्वाददाता कोण? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता राज्यभरातील जनतेची नजर पोलिस यंत्रणेवर आणि राजकीय नेत्यांवर लागली आहे.