तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा धूर आता पुणे आणि सोलापूरपर्यंत पोहोचला आहे. पोलिसांच्या हातात सापडलेल्या दोन नव्या आरोपींनी या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. सुलतान शेखला पुण्यातून आणि जीवन साळुंकेला सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. आता एकूण आरोपींची संख्या १८ वर पोहोचली आहे. मात्र, या सर्व गोंधळात पोलिसांच्या थंडपणावरच प्रश्नचिन्ह आहे!
पोलीस प्रेस नोट का नाही?
धाराशिव पोलीस मुख्यालय दररोज पत्रकारांना प्रेस नोट पाठवते. पण तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात एकही प्रेस नोट का नाही? पत्रकारांना माहिती देणे टाळणे म्हणजे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न तर नाही ना?
अंधारात ठेवलेली नावे, मोठे मासे अजूनही मोकाट!
या प्रकरणात १८ आरोपी दाखल आहेत, पण त्यापैकी ४ जणांची नावे गुप्त का ठेवली आहेत? फरार आरोपी स्वराज्य उर्फ पिनू तेलंग, जो माजी नगराध्यक्षाचा हस्तक असल्याचे बोलले जात आहे, त्याला अजूनही अटक का नाही? पोलीस मोठ्या माशाला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना?
राजकीय वरदहस्तामुळे कारवाईला मागे का?
तुळजापूरातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे चर्चा आहे. राजकीय वरदहस्तामुळे पोलीस हात का आखडून घेत आहेत? एका मोठ्या नेत्याच्या आशीर्वादामुळेच का पिनू तेलंग मोकाट फिरत आहे?
जिल्ह्याचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव!
परांडा आणि तुळजापूर तालुक्यांत एम.डी. ड्रग्जची वाहतूक आणि विक्री जोरात सुरू आहे. तरुणांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या या रॅकेटमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे समाजात संतापाची लाट आहे.
नेत्यांची केवळ ‘मागणी’, कारवाई शून्य!
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. पण मागणी करून काय उपयोग? कृती कधी? दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली, पण उत्तर सभागृहात मिळण्याऐवजी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या खासगी पीएने सोशल मीडियावर व्हायरल केले!
पोलीस खात्याची ‘मनमानी’ – जनतेचे आक्रोश!
सुरुवातीला हेड कॉन्स्टेबलकडे, नंतर एपीआयकडे आणि अखेर पीआयकडे देण्यात आलेला तपास नेमका कुठे जात आहे? पोलीस खात्याच्या या तुकड्या-तुकड्यांच्या कारवाईवर लोकांचा विश्वास उडाला आहे. जनतेचे आक्रोश वाढत चालले आहेत, पण पोलीस मात्र ‘आडातच घोटाळा’ करत आहेत!
दोषींवर कठोर कारवाई करा!
हा प्रश्न केवळ ड्रग्जचा नाही, तर एका संपूर्ण पिढीच्या विनाशाचा आहे. या रॅकेटमागे कोणाचे हात आहेत हे शोधून काढण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. समाजाने आवाज उठवला पाहिजे, कारण आता थांबले नाही तर उद्याचे भविष्य उद्ध्वस्त होईल!