धाराशिव: रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य कार्यालयात घुसून वनरक्षक महिलेचा विनयभंग करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ९ ऑगस्ट २०२३ रोजी घडली होती आणि आज (दि. २० नोव्हेंबर २०२५) न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. दत्ता मोहन तुपे (रा. येडशी, ता. धाराशिव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी उषा शंकर जाधव या वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. ९ ऑगस्ट २०२३ रोजी त्या रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य कार्यालयात आपले शासकीय कामकाज करत होत्या. दुपारी २.३० च्या सुमारास आरोपी दत्ता तुपे तिथे आला. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माहिती न मागता थेट फिर्यादीकडे माहिती मागितली आणि त्यांच्यावर राजकीय दबाव टाकला. तसेच, फिर्यादीशी हुज्जत घालून, त्यांना लज्जा वाटेल अशा प्रकारे धक्काबुक्की केली आणि अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावेळी आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३५३, ३५४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. एस. गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, उस्मानाबाद (धाराशिव) श्रीमती ए. डी. देव यांच्या समोर झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. महेंद्र बी. देशमुख यांनी बाजू मांडली आणि एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयाने समोर आलेला साक्षीपुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी दत्ता मोहन तुपे याला कलम ३५३, ३५४ आणि ५०६ नुसार दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी आणि २१,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. महेंद्र देशमुख यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी सहकार्य केले






