धाराशिव: बनावट कागदपत्रे तयार करून शौचालयाचे शासकीय अनुदान लाटणे आणि मठाच्या जमिनीवर कब्जा करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आळणी (ता. जि. धाराशिव) येथील सरपंच, ग्रामसेवक आणि एकाच कुटुंबातील सदस्यांसह एकूण ७ जणांवर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत अंबऋषी अर्जुन कोरे (वय ६२, रा. आळणी) यांनी फिर्याद दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ ते २०२१ या कालावधीत आणि त्यानंतर २९ ऑगस्ट २०२४ पर्यंतच्या काळात हा गैरव्यवहार झाला आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट दस्त (कागदपत्रे) तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे शौचालयाचे शासकीय अनुदान उचलून शासनाची फसवणूक केली.
याशिवाय, गावातील ‘जंगम मठा’च्या जमिनीवरही आरोपींपैकी काही व्यक्तींनी बेकायदेशीर कब्जा केला आहे. या जमिनीचे देखील बनावट दस्त तयार करून त्याआधारे अनुदान उचलत शासकीय रकमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कोणाकोणावर झाला गुन्हा दाखल?
या प्रकरणी खालील ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
१. महानंदा संतोष चौगुले (वय ३५, सरपंच, रा. आळणी)
२. सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड (वय ५०, ग्रामसेवक, रा. चोराखळी, ता. कळंब)
३. बबन विठ्ठल माळी (वय ६४)
४. गयाबाई बबन माळी (वय ६०)
५. धनंजय बबन माळी (वय ४५)
६. तानाजी विठ्ठल माळी (वय ५०)
७. फुलचंद सदाशिव माळी (वय ४०) (सर्व रा. आळणी)
न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
फिर्यादी अंबऋषी कोरे यांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत न्यायालयात दाद मागितली होती. पाचवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, धाराशिव यांनी बीएनएसएस (BNSS) कलम १७५ (३) अन्वये पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार १८ नोव्हेंबर २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(५) (विश्वासघात), ३१८(४) (फसवणूक), ३३८(३), ३३६(३) (बनावट दस्तऐवज) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.







