नळदुर्ग – शेजारी शेती करत असल्याचा राग मनात धरून एका ६१ वर्षीय शेतकऱ्याचे पाच एकर तागाचे खतपीक जाळून नुकसान केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथे घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी राजकुमार लक्ष्मणराव शिंदे (वय ६१, रा. देवसिंगा नळ, ता. तुळजापूर, ह.मु. सोलापूर) यांची देवसिंगा नळ शिवारातील गट क्रमांक ७९ मध्ये शेतजमीन आहे. फिर्यादी हे मागासवर्गीय समाजाचे असल्याची माहिती आरोपींना होती. ते आपल्या शेजारी शेती करतात, हे सहन न झाल्याने आरोपींनी संगनमत करून दि. ०८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या शेतातील वाळलेल्या तागाच्या पिकाला आग लावली. यामध्ये त्यांचे सुमारे पाच एकर क्षेत्रातील खत पिकाचे मोठे नुकसान झाले.
या घटनेनंतर फिर्यादी राजकुमार शिंदे यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विलास तुकाराम शिंदे, संगीता रमेश सुरवसे, इब्राहिम चांद पाशा शेख यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. देवसिंगा नळ, ता. तुळजापूर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२४(४), ३२६(एफ) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.