नळदुर्ग: प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमंगल मल्टीस्टेट बँकेचा शाखाधिकारी कैलास घाटे याने रचलेल्या २५ लाखांच्या दरोड्याच्या बनावामागील कारण समोर आले आहे. शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडून आणि खासगी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने घाटेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या बनावाचा पर्दाफाश करत घाटे याला अटक केली असून, लुटल्याचा बनाव केलेली संपूर्ण २५ लाखांची रक्कम त्याच्या घरातून जप्त करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
३० जून रोजी, लोकमंगल मल्टीस्टेट बँकेचा शाखाधिकारी कैलास घाटे याने २५ लाख रुपये सोलापूरच्या मुख्य शाखेत नेत असताना राष्ट्रीय महामार्ग ६५ वर चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड टाकून आणि शस्त्राने वार करून रक्कम लुटल्याची तक्रार केली होती. हा दरोडा खरा वाटावा यासाठी त्याने स्वतःच्या अंगावर ब्लेडने वारही करून घेतले होते.
पोलिसांनी कसा केला पर्दाफाश?
मात्र, पोलिसांना सुरुवातीपासूनच घाटेच्या कथेत विसंगती आढळली होती. केवळ १३ हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याकडे २५ लाखांची मोठी रक्कम मोटरसायकलवरून नेण्याची जबाबदारी का दिली, यासारख्या प्रश्नांमुळे पोलिसांचा संशय बळावला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर घाटेच्या बनावाचा पर्दाफाश झाला. कसून चौकशी केली असता, घाटेने गुन्ह्याची कबुली दिली.
बनावामागील कारण
नळदुर्ग शहरात घाटे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भामट्याने शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला होता. याच जाळ्यात घाटे अडकला. त्याने व्याजाने १० लाख रुपये काढून गुंतवले होते. वर्षभरात व्याजासह ही रक्कम १५ लाखांवर पोहोचली आणि खासगी सावकार पैशांसाठी त्याच्या मागे लागले होते. या सावकारांची परतफेड करण्यासाठी घाटेने बँकेच्या पैशांवर डल्ला मारून दरोड्याचा बनाव रचला, पण तो त्याच्याच अंगलट आला.
पोलिसांनी घाटे याच्या घरातून लपवलेली संपूर्ण २५ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. त्याच्यावर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे बँकेच्या सुरक्षा प्रणालीवर आणि कर्मचारी निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.