परंडा : परंडा-करमाळा रस्त्यावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत तब्बल १० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २१ जुलै) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नायरा पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. याप्रकरणी वाहतूक करणाऱ्या चालकाविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सठवाजी लोंढे (वय ५०, लातूर चार्ज धाराशिव) यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी परंडा-करमाळा रस्त्यावर सापळा रचला. मध्यरात्री दोनच्या सुमारास एका वाहनाची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेला मुद्देमाल आढळून आला. यामध्ये ‘रॉयल ७७७’ सुगंधित तंबाखूच्या ४० बॅग आणि ‘हिरा पानमसाला’च्या ८० बॅग असा एकूण १० लाख रुपयांचा साठा होता.
हा मुद्देमाल विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपी सागर मधुकर गायकवाड (वय २८, रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने अन्न सुरक्षा आयुक्त आणि औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपी सागर गायकवाड विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.