बार्शी – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे आधीच खळबळ उडालेली असताना, आता बार्शी शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा परंडा रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये घातक एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज, एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे. या यशस्वी कारवाईमुळे बार्शी पोलिसांचे कौतुक होत असले तरी, परंडा पोलीस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या कथित निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गोपीनाथ कुंजीर (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवार, दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे ११:२० वाजता, त्यांना परंडा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ, हॉटेल स्वराज समोर काही इसम संशयास्पदरीत्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
- असद हसन देहलुज (वय ३७, रा. पल्लागल्ली, परांडा, जि. धाराशिव)
- मेहफुज महंमद शेख (वय १९, रा. बावची, ता. परांडा, जि. धाराशिव)
- सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख (वय ३२, रा. कसबापेठ, काझीगल्ली, बार्शी, जि. सोलापूर)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
पोलिसांनी केलेल्या झडतीत आरोपींकडून एकूण १३,०२,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात खालील वस्तूंचा समावेश आहे:
- असद देहलुजकडून:
- १० लाख रुपये किमतीची टोयोटा कोरोला आल्टीस कार (MH 12 HN 7437).
- ९१,९०० रुपये किमतीचे ९.१९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज.
- ६०,००० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल (MADE IN ENGLAND आणि UAS असे मार्किंग असलेले).
- ३,००० रुपये किमतीची ३ जिवंत काडतुसे (KF 7.65 मार्किंग).
- १०,००० रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल.
- ८,००० रुपये रोख रक्कम.
- मेहफुज शेखकडून:
- ५७,३०० रुपये किमतीचे ५.७३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज.
- १०,००० रुपये किमतीचा रेडमी मोबाईल.
- सरफराज शेखकडून:
- ५१,२०० रुपये किमतीचे ५.१२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज.
- १०,००० रुपये किमतीचा विवो मोबाईल.
- १,००० रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा.
कायदेशीर कारवाई:
या तिन्ही आरोपींविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५३/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८(क), २२(ब), २९, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि बाळगण्यासोबतच, जिल्हाधिकाऱ्यांनी ३ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या आणि ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२५ पर्यंत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि काडतुसे बाळगली होती.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माकणे करत आहेत. या कारवाईमुळे बार्शी आणि परिसरातील अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस कसून तपास करत आहेत.
आता हाजी मस्तानवर टांगती तलवार
परंड्यात राजरोस ड्रग्ज विकले जात असताना, परंडा पोलीस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा मूग गिळून गप्प होती. आता बार्शी पोलिसांच्या या कारवाईमुळे मुख्य म्होरक्या हाजी मस्तानवर कारवाई होण्याची शक्यता आहे.