बार्शी: बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात रॅगिंगचा अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १२ वीच्या चार विद्यार्थ्यांनी ११ वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला खोलीत डांबून क्रिकेटच्या स्टम्पने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याचा एक कान निकामी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रूम साफ करण्यास नकार दिल्याने मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हा ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याला १२ वीच्या चार सीनियर विद्यार्थ्यांनी रूम स्वच्छ करण्यास आणि झाडू मारण्यास सांगितले. मात्र, पीडित विद्यार्थ्याने हे काम करण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून सीनियर विद्यार्थ्यांनी त्याला एका रूममध्ये लॉक केले आणि तब्बल तीन तास स्टम्पने जबर मारहाण केली. मारहाण करणारे विद्यार्थी हे दारूच्या नशेत होते, असा आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर
या अमानुष मारहाणीत विद्यार्थ्याला जबर मुक्कामार लागला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याच्यावर धाराशिव (उस्मानाबाद) येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीमुळे आपल्याला एका कानाने ऐकू येत नसून कान निकामी झाल्याची तक्रार या विद्यार्थ्याने केली आहे.
महाविद्यालयाची भूमिका संशयास्पद
इतकी गंभीर घटना घडूनही महाविद्यालय प्रशासन मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे भासवत आहे. या प्रकरणी महाविद्यालयाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही किंवा याबाबत काहीही बोलण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. महाविद्यालय दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
“मला रूममध्ये बोलावून झाडू मारायला लावला. मी नाही म्हटल्यावर त्यांनी मला रूममध्ये कोंडून तीन तास स्टम्पने मारले. ते दारूच्या नशेत होते. मला आता एका कानाने ऐकू येत नाहीये. कॉलेज प्रशासन दोषींना पाठीशी घालत आहे.”
– प्रतिक बनसोडे (पीडित विद्यार्थी)
या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






