बीड | ज्या पोलिसांच्या वर्दीवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते, त्याच वर्दीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. ऑनलाइन रमी सर्कल आणि सट्ट्याच्या नादात कर्जबाजारी झालेल्या एका सहायक फौजदाराने चक्क सराईत चोराचा मार्ग पत्करला. एका गुन्ह्यात जामिनावर बाहेर असतानाही, त्याने आपल्या दोन साथीदारांसह तब्बल सात दुचाकी चोरल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कर्जाच्या विळख्यात, गुन्हेगारीच्या अंधारात
वायरलेस विभागात कार्यरत असलेला सहायक फौजदार अमित मधुकर सुतार (वय ३५) याला ड्रीम ११, रमी ॲप, ऑनलाइन सट्टा आणि दारूचे व्यसन जडले होते. या व्यसनापायी त्याने मोठी रक्कम गमावली आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याची कबुली तपासात दिली आहे.
चोरीची मालिका: बॅटरी ते बाईक
सुतारच्या गुन्हेगारीची सुरुवात पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच झाली.
- पहिली चोरी: २४ डिसेंबर २०२४ रोजी त्याने वायरलेस विभागातील इन्व्हर्टरच्या १० बॅटऱ्या चोरल्या. या प्रकरणी अधिक तपास केला असता, त्याच्याकडून तब्बल ५८ बॅटऱ्या आणि एक एलईडी टीव्ही जप्त करण्यात आला होता.
- निलंबन आणि जामीन: या गंभीर गुन्ह्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत काँबत यांनी त्याला तात्काळ निलंबित केले. पुढे त्याला जामीन मिळाला.
- चोरीचा दुसरा डाव: जामिनावर सुटल्यावर सुधारायचे सोडून, सुतारने आपल्या दोन साथीदारांना सोबत घेऊन बीड शहरातून एक-दोन नव्हे, तर तब्बल सात दुचाकी लंपास केल्या.
अखेर सापडला जाळ्यात
स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत हुशारीने सापळा रचून या तिघांच्याही मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमित मधुकर सुतार (वय ३५), स्वराज कोंडीराम बोबडे (वय २६) आणि हितोपदेश गणेश वडमारे (वय ३०) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या सर्व सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले की, तिन्ही चोरट्यांकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ते सध्या बीड शहर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.







