धाराशिव: बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथील एका डॉक्टरने आपल्या पॅथीची पदवी बाजूला सारून थेट ‘MBBS’ ची पदवी वापरल्याचे जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या अहवालात सिद्ध झाले आहे. मात्र, या गंभीर प्रकारावर तातडीने कठोर कारवाई करण्याऐवजी जिल्हा आरोग्य विभागाने आता हे प्रकरण पोलिसांकडे ढकलून आपली जबाबदारी झटकल्याचा प्रकार समोर आला आहे. कागदी घोडे नाचवत प्रशासनाकडून कारवाईसाठी चाललेली ही ‘टोलवाटोलवी’ तक्रारदाराची मात्र दमछाक करणारी ठरत आहे.
नेमके प्रकरण काय?
बेंबळी येथील डॉ. सुधिर झिंगाडे यांच्या विरोधात आकाश गोरोबा चव्हाण (रा. रुईभर) यांनी चुकीच्या उपचारामुळे रुग्णास त्रास झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ‘जिल्हा निग्लिजन्स कमिटी’ने (District Negligence Committee) चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. डॉ. झिंगाडे यांची मूळ पदवी ‘D.M. & S.’ असतानाही त्यांनी आपल्या मेडिकल प्रिस्क्रिप्शनवर (चिट्ठीवर) चक्क ‘MBBS’ अशी पदवी लावल्याचे आढळून आले. हे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (MMC) नियमांचे उल्लंघन आहे. तसेच त्यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार वैध प्रमाणपत्र सुद्धा नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
कारवाई कुणी करायची? आरोग्य विभागाची हातझटकणी
एकीकडे डॉक्टरचा दोष सिद्ध झालेला असताना, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळी पत्रे काढून कारवाईची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
१. पहिले पत्र (वैद्यकीय मंडळाला): जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाच्या (MMC) निबंधकांना पत्र लिहून डॉ. झिंगाडे यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
२. दुसरे पत्र (पोलिसांना): हे पत्र अधिक महत्त्वाचे आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) यांना पत्र लिहून सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बोगस डॉक्टर समितीचे पदसिद्ध सचिव हे पोलीस अधिकारी असल्याने, यापुढील सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.
तक्रारदाराला नाहक मनस्ताप
आरोग्य विभागाने केवळ पत्रव्यवहार करून थांबले नाही, तर तक्रारदार श्री. आकाश चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे की, “आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने यापुढे उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) यांच्याशी संपर्क साधावा”.
त्यामुळे, बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभाग पुढाकार घेणार की पोलीस प्रशासन? या प्रशासकीय टोलवाटोलवीमध्ये सर्वसामान्य तक्रारदाराला मात्र न्यायासाठी आता आरोग्य विभाग ते पोलीस मुख्यालय अशा चकरा माराव्या लागणार आहेत.
-
डॉ. सुधिर झिंगाडे (बेंबळी) यांनी D.M. & S. असूनही MBBS पदवी वापरली.
-
चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर दोषी आढळले.
-
आरोग्य विभागाने कारवाई स्वतः करण्याऐवजी चेंडू पोलिसांच्या आणि मेडिकल कौन्सिलच्या कोर्टात टोलावला.
-
तक्रारदाराला आता पोलिसांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.







