धाराशिव: बेंबळीमधील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुधीर झिंगाडे यांना त्यांच्या बाह्यरुग्ण-डे केअर सेंटरमध्ये नियमांचे पालन न केल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन आणि विशिष्ट आजारांची माहिती शासकीय यंत्रणेला न देणे यांसारख्या गंभीर त्रुटी आढळून आल्याने, दोन दिवसांत खुलासा सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला डॉ. झिंगाडे यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारावर, तालुका आरोग्य अधिकारी, धाराशिव यांनी १६ ऑगस्ट २०२४ रोजी झिंगाडे नर्सिंग होमची चौकशी केली असता त्यात काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावर खुलासा मागितला असता तो वेळेत न मिळाल्याने, त्रुटींची पूर्तता होईपर्यंत त्यांचा वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर डॉ. झिंगाडे यांनी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी खुलासा सादर करून, आपण फक्त बाह्यरुग्ण-डे केअर सेंटर चालवत असल्याचे आणि आपले महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नोंदणीकरण नूतनीकरण केले असल्याचे स्पष्ट केले. यानंतर, २८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रानुसार त्यांना काही विशिष्ट अटी व सूचनांच्या अधीन राहून व्यवसाय चालवण्यास परवानगी देण्यात आली होती.
या सूचनांचे पालन करणे होते बंधनकारक:
- रुग्णाला २४ तासांपेक्षा जास्त वेळ दाखल करून घेऊ नये.
- प्रिस्क्रिप्शन पॅडवर शैक्षणिक अर्हतेची योग्य नोंद करणे.
- आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसारच (D.M.S.) चिकित्सा करणे.
- बायोमेडिकल कचऱ्याचे नियमानुसार व्यवस्थापन करणे.
- विशिष्ट आजारांच्या (Notifiable disease) रुग्णांची माहिती स्थानिक पर्यवेक्षक अधिकाऱ्याला देणे.
या सूचनांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. झिंगाडे यांच्या डे केअर सेंटरला भेट दिली असता, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन आणि विशिष्ट आजारांची माहिती देण्यासंबंधीच्या सूचनांचे (सूचना क्रमांक ४ व ५) पालन होत नसल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
याच अहवालाच्या आधारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एल. हरिदास यांनी १२ सप्टेंबर २०२५ रोजी ही नवीन नोटीस बजावली असून, सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे आपल्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा दोन दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे. खुलासा न दिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असेही नोटीसमध्ये स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नोटीसची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.