तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात यंदाही दिपावलीनिमित्त नरक चतुर्दशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसाच्या प्रारंभी तुळजाभवानी मातेला सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर मातेला आकर्षक अलंकार आणि वस्त्रे परिधान करण्यात आली. दुपारी महाआरती करण्यात आली आणि भाविकांना प्रसाद वाटण्यात आला.
सायंकाळी मंदिरात भेंडोळी उत्सवाची लगबग सुरू झाली. हा उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच साजरा केला जातो, यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे. अकरा फूट लांब काठीला केळीचा घड, केळीचे साल, चिंचेच्या फांद्या आणि आंब्याच्या झाडाची साल बांधून त्यावर तेलात बुडवलेले कापड पेटवून भेंडोळी तयार केली जाते. ही भेंडोळी काळभैरव मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरात आणली जाते. देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा घालून वेशीबाहेर भेंडोळी विझवली जाते.
भेंडोळी उत्सवावेळी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात भेंडोळीची मिरवणूक निघाली. रात्री मंदिरात लक्ष्मीपूजन आणि खजिनापूजन करण्यात आले. यावेळी मंदिर आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते.
भेंडोळी म्हणजे काय ?
भेंडोळी म्हणजे एका अकरा फूट लांब व साधारण सात ते आठ इंच जाडीच्या काठीला (दांड) मधोमध कच्च्या केळीचा अखंड घड बांधला जातो. नंतर संपूर्ण दांडावर केळीच्या खोडाचे जे साल गुंडाळतात नंतर चिंचेच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्यांचा एक थर संपूर्ण दांडावर लावला जातो. यावर आंबड्याच्या झाडाची साल व पीळ घातलेल्या दोरीचा वापर करून सर्व बांधणी झाल्यानंतर एका लोखंडी साखळदंडामध्ये सुती कपड्याचे पलिते तेलामध्ये बुडवून ओवले जातात. भेंडोळीची संपूर्ण बांधणी तयारी व भेंडोळी प्रज्वलन श्री काळभैरव मंदिराच्या समोर केली जाते.
भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून श्रीतुळजाभवाणी देवीच्या मंदिरात आणली जाते. नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशीबाहेर आणून भेंडोळी विझवली जाते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजापूर येथील भेंडोळी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. भाविकांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.