भूम : कत्तलीसाठी पिकअपमधून निर्दयतेने वाहतूक केल्या जाणाऱ्या गोवंशियांना भूम पोलिसांनी जीवदान दिले आहे. या कारवाईत ३४ वासरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणासह एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून, वाहनासह एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई शनिवारी, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३७ च्या सुमारास भूम येथील एस. पी. कॉलेज, पार्डी रोड परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पिकअप वाहनातून गोवंशियांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात अत्यंत निर्दयीपणे, चाऱ्या-पाण्याची सोय न करता जनावरे कोंबलेली आढळली.
या वाहनात ६ जिवंत वासरे आणि ३४ मयत वासरे आढळून आली. गुदमरल्यामुळे आणि निर्दयी वाहतुकीमुळे या वासरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी वाहनातील एकूण ६०,००० रुपये किमतीची वासरे आणि वाहन असा एकूण ४,६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी रेहान आल्ताफ शेख (वय १९, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलीस सरकारच्या वतीने फिर्यादी झाले असून, आरोपींविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५), प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, प्राणी संरक्षण अधिनियम आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.