भूम : शहरातील गालिब नगर परिसरातील एका बॅटरीच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवार रात्री ते सोमवार सकाळच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाजीद मुबारक शेख (वय २४, रा. गालिब नगर, भूम) यांनी फिर्याद दिली आहे. वाजीद शेख यांचे गालिब नगरमध्ये ‘इंडियन बॅटरी ॲटो इलेक्ट्रिशियन’ नावाचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे २० जुलै रोजी रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.
दुसऱ्या दिवशी, २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता दुकानातील एक्साईड कंपनीच्या बॅटऱ्या आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने दुकानातून एकूण ५९,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या घटनेनंतर वाजीद शेख यांनी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) आणि ३०५ (ए) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.