भूम – “ही जागा आमची आहे,” असे म्हणत हॉटेल मालक आणि त्यांच्या मुलाला हॉटेलमध्येच कोंडून, शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार भुम शहरातील गोलाई चौकात घडला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी भुम पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हॉटेल व्यावसायिक शिवाजी वामन चंदनशिवे (वय ६३, रा. वाकवड, ता. भूम ) यांनी २२ जुलै रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी चंदनशिवे यांचे भुममधील परंडा रोडवरील गोलाई चौकात ‘पूर्णब्रह्म इडलीगृह’ नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी, दि. २२ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिल्या उर्फ रावजी दत्ता काळे, दत्ता बिरु काळे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम (सर्व रा. कल्याणनगर पारधी पिढी, भूम ) हे त्यांच्या हॉटेलमध्ये आले.
आरोपींनी हॉटेलच्या जागेवर आपला हक्क सांगत चंदनशिवे आणि त्यांच्या मुलासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हॉटेलचे दोन्ही दरवाजे आतून बंद करून बाप-लेकांना गैरकायदेशीरपणे कोंडून ठेवले. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या चंदनशिवे यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच तिन्ही आरोपींनी तेथून पळ काढला.
शिवाजी चंदनशिवे यांच्या फिर्यादीवरून भुम पोलिसांनी पिल्या काळे, दत्ता काळे आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२७(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.