भूम – जमिनीच्या नावावरून झालेल्या वादातून एका ५० वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून, ढाब्यावर नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची आणि सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना भुम शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून भुम पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश सोमनाथ भोळे (वय ५०, रा. समर्थ नगर, भुम) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार, दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भुम येथील परंडा रोडवरील माऊली मंदिराजवळ ही घटना घडली.
आरोपी सुरेश रंगनाथ पवार, धनंजय पवार, युवराज पवार आणि रंगनाथ पवार (सर्व रा. भुम) यांनी “जमीन नावावर कर” या कारणावरून सतीश भोळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, आरोपींनी त्यांना जबरदस्तीने एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून सरमकुंडी रोडवरील रंगनाथ पवार यांच्या ढाब्याजवळ नेले. तिथे त्यांना लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.
एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी भोळे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला.
या भयंकर प्रकारानंतर, सतीश भोळे यांनी बुधवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी भुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ११९(१), १४०(३), ३५२, ३(५) अन्वये अपहरण, मारहाण, आणि दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे. भुम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.