भूम : लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय महिलेवर तब्बल आठ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची आणि तिचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणुकीने घेतल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच एका तरुणावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील पीडित महिला घरी असताना, गावातीलच एका तरुणाने तिच्याशी ओळख वाढवली. २४ नोव्हेंबर २०१७ ते २२ जुलै २०२५ या प्रदीर्घ कालावधीत आरोपीने तिला लग्नाचे खोटे वचन दिले. या आमिषाखाली त्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
इतकेच नाही, तर आरोपीने भूम येथील आय.टी.आय. जवळ घेतलेल्या जमिनीत हिस्सा देण्याचे आमिष दाखवून पीडितेचा विश्वास संपादन केला. या बहाण्याने त्याने तिच्याकडून १४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले, ज्याची अंदाजे किंमत ५ लाख १९ हजार ३७० रुपये आहे. दागिने घेतल्यानंतर त्याने ते परत न करता महिलेची फसवणूक केली.
अखेरीस, आपली फसवणूक आणि लैंगिक शोषण झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित महिलेने २७ जुलै २०२५ रोजी भूम पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६९ (लग्नाचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणे) आणि कलम ३१८(२) (फसवणूक) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.