धाराशिव: राज्यात बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर संतापाची लाट उसळली असताना, धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवली असून, सामाजिक वातावरण ताणले गेले आहे.
भूम तालुक्यातील एका दुर्गम भागात राहणारी एक आदिवासी अल्पवयीन मुलगी, तिच्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर गेली असता, तिच्यावर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. या अमानवीय घटनेनंतर तिला तातडीने धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले .पीडित मुलीला एका आरोपीने बेदम मारहाण केल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. पाच आरोपींपैकी चार जणांना तात्काळ अटक करण्यात आली असून, उर्वरित एक आरोपी अद्याप फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे
.पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला असून, या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.अप्पर पोलीस अधीक्षक गौर हसन यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी तातडीने कार्यवाही केली असून, उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत
या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.या घटनेने संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.