भूम : भूम तालुक्यातील एका गावात घरात झोपलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिसांनी तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जवळपास नऊ महिन्यांपूर्वी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलगी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी होती. यावेळी त्याच गावातील एका तरुणाने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास तुझ्या घरातील लोकांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही आरोपीने पीडितेस दिली होती. या धमकीमुळे घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
अखेर, पीडितेच्या आईने हिंमत दाखवून दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम), ३५१(३) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.