भूम – वाकवड (ता. भूम) येथे शेतातून बैलगाडी नेण्याच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात फिर्याद दाखल केली असून, भूम पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
पहिली तक्रार : बैलगाडी नेण्याच्या वादातून मारहाण
फिर्यादी नवनाथ सोमनाथ टकले (वय २९, रा. वाकवड, ता. भूम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १६ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता त्यांना आरोपी मंगल विकास टकले, राधा भरत टकले, सखुबाई श्रीमंत टकले, विकास आण्णा टकले, श्रीमंत आण्णा टकले, भरत विकास टकले, अभिजीत विकास टकले आणि आण्णा देवराव टकले (सर्व रा. वाकवड, ता. भूम) यांनी शेतातून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, काठीने आणि दगडाने मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी तक्रार : केस करण्याच्या कारणावरून हल्ला
याच घटनेत दुसऱ्या गटानेही तक्रार दाखल केली असून, फिर्यादी अभिजीत विकास टकले (वय २४, रा. वाकवड, ता. भूम) यांच्या तक्रारीनुसार, दि. १६ मार्च रोजी दुपारी १२:०० वाजता आरोपी नवनाथ सोमनाथ टकले, बीरमल सोमनाथ टकले, सोमनाथ राजेंद्र आश्रुबा टकले, सागर हरिशचंद्र टकले, पूजा नवनाथ टकले, विठ्ठल आश्रुबा टकले आणि हरिशचंद्र सोमनाथ टकले (सर्व रा. वाकवड, ता. भूम) यांनी केस करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच कोयता, काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली, यात त्यांची आई, भाऊ, आजोबा आणि इतर कुटुंबीय जखमी झाले.
या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात कलम ११८(१), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू
या हाणामारीत दोन्ही बाजूंना दुखापती झाल्या असून, पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.