तुळजापूर : तुळजापूर शहर आणि तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका घटनेत भरदिवसा शासकीय विश्रामगृहाच्या (Rest House) समोरून दुचाकी लांबवण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत शेतकऱ्यांच्या शेतातून तीन म्हशी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि.८) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना तुळजापूर शहरात घडली. संतोष राजेंद्र दुधभाते (वय ३०, रा. वडगाव लाख, ता. तुळजापूर) हे कामानिमित्त तुळजापूर येथे आले होते. त्यांनी आपली ५० हजार रुपये किमतीची बजाज सीडी १०० कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच २५ ए.यु. ११६०) ही रेस्ट हाऊसच्या ऑफिससमोर उभी केली होती. मात्र, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.०० या अर्ध्या तासाच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही दुचाकी पळवून नेली.
दुसरी घटना तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदुरी येथे घडली. हणमंत हरिहर पाटील (वय ४६, रा. नांदुरी, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासह गावातील पंडीत केशव कोळी आणि तानाजी गोपीनाथ गोंगाणे यांच्या शेतात बांधलेल्या तीन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. चोरीला गेलेल्या या तीन म्हशींची एकूण किंमत ९० हजार रुपये इतकी आहे.
या दोन्ही प्रकरणी अनुक्रमे तुळजापूर आणि तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






