धाराशिव: जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी (दि. २१) धाराशिव शहर आणि बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी एकाच दिवशी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
ओम मंगल कार्यालयासमोरून ‘हिरो शाईन’ गायब (धाराशिव शहर)
पहिली घटना धाराशिव शहरातील ओम मंगल कार्यालयासमोर घडली. दशरथ शेतीबा धोतरे (वय ३८, रा. तुळजापूर नाका, पापनाश नगर) यांनी आपली ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो शाईन (MH 25 S 1082) ही दुचाकी ओम मंगल कार्यालयासमोर लावली होती. दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाब्यासमोरून ६० हजारांची दुचाकी चोरीला (बेंबळी)
दुसरी घटना बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारी गावच्या शिवारात घडली. चंद्रशेखर महादेव सोमवंशी (वय ३२, रा. आरणी, ता. लोहारा) यांची ६० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (MH 25 BE 5394) ही दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री समाधान धाब्यासमोर घडली होती. याप्रकरणी रविवारी (दि. २१) बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेडसिंगा येथून किराणा दुकानासमोरून गाडी लांबवली (बेंबळी)
तिसऱ्या घटनेत, मेडसिंगा (ता. धाराशिव) येथील महारुद्र बाबुराव वैद्य (वय ३५) यांची ३५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर (MH 25 AQ 7937) ही दुचाकी चोरीला गेली आहे. २९ नोव्हेंबरच्या रात्री ते ३० नोव्हेंबरच्या पहाटेदरम्यान त्यांच्या किराणा दुकानासमोर लावलेली गाडी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. या उशिराने उघडकीस आलेल्या चोरीप्रकरणी २१ डिसेंबर रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल केले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.






