धाराशिव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी बजावत मोटारसायकल चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक केली आहे. सुरज उर्फ बबल्या उर्फ डालग्या श्रीपती काळे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 272/2024 कलम 394 मधील पाहिजे आरोपी वडजी रोडवरील फटाक्याच्या कारखान्याजवळ थांबलेला आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
चोरीच्या मोटारसायकली जप्त
आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने धाराशिव शहरातून मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. त्याच्या आणखी चौकशीत, त्याने आणि त्याचा साथीदार कुक्या उर्फ मोतीराम बादल शिंदे यांनी मिळून अनेक मोटारसायकली चोरून त्या मोहामध्ये एका पत्र्याच्या शेडच्या मागे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पाच मोटारसायकली तसेच दोन डिझेल कॅन्स जप्त केले.
चोरीचे गुन्हे आणि पुढील कारवाई
तपासादरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींबाबत खालील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे आढळले:
- आनंदनगर पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 100/2025 (कलम 303(2)), 276/2020 (कलम 379)
- नळदुर्ग पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 57/2025 (कलम 3303(2)), 83/2025 (कलम 303(2))
- धाराशिव शहर पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 73/2023 (कलम 379)
- येरमाळा पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 40/2025 (कलम 303(2))
- गातेगाव, लातूर पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 23/2025 (कलम 303(2))
एकूण 1,61,510 रुपये किमतीच्या चोरीच्या मोटारसायकली जप्त करून आरोपीला आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक महेबुब अरब, पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे, प्रकाश बोईनवाड आणि सुनिल मोरे यांच्या पथकाने केली.या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.