नमस्कार मंडळी! मी बोलतोय, धाराशिवचा तोच ‘बहुचर्चित’ (म्हणजे राजकारण्यांच्या भाषणात अडकलेला) १४० कोटींचा रस्ता. अहो, तब्बल दीड वर्ष मी सरकारी फायलींच्या उबदार कुशीत ‘वर्क ऑर्डर’ नावाच्या जन्माच्या दाखल्याची वाट बघत पडून होतो. बाहेर म्हणे माझ्यावरून मोठं ‘रणकंदन’ सुरू होतं.
माझी अवस्था त्या राजकुमारासारखी झाली होती, ज्याला एका झारीतल्या शुक्राचार्याने शाप दिला होता. पण प्रॉब्लेम हा होता की, इथे एक नाही, तर तीन-तीन शुक्राचार्य असल्याचा संशय होता!
पहिला अंक: ‘स्थगिती’चा शाप
मी मस्तपैकी फायलीत आराम करत होतो, तेव्हाच माझ्या कानावर आलं की, आमदार राणा पाटलांनी जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या कामांना ‘स्थगिती’ मंत्र मारला. झालं! पालकमंत्री प्रताप सरनाईक संतापले. त्यांनी थेट माझ्या १४० कोटींच्या जन्मावरच ‘प्रति-स्थगिती’ मंत्र मारला. म्हणजे बघा, भांडण यांचं आणि बळी माझा! मी फायलीतच कोमात गेलो.
दुसरा अंक: ‘मर्जीतील गुत्तेदार’ नावाचा राक्षस
तेवढ्यात महाविकास आघाडीचे वीर (ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस) रणांगणात उतरले. त्यांनी आरोपांची तोफ डागली. “अहो, हा विलंब नाहीये, हा ‘त्यांच्या’ मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्यासाठी रचलेला चक्रव्यूह आहे!”
त्यांनी तर अजून एक बॉम्ब टाकला. म्हणे, माझ्या जन्मासाठी (म्हणजे कामासाठी) आधी २२ कोटी रुपये ‘अतिरिक्त’ लाच मागितली जात होती. (मलाच लाज वाटली, जन्माआधीच माझा भाव वाढवला!). मविआने उपोषणाचा इशारा दिला, रास्ता रोको केला. त्यांच्या आंदोलनामुळे म्हणे ते २२ कोटी वाचले. (चला, मी जन्मतःच ‘बचत’ करणारा रस्ता ठरलो!)
तिसरा अंक: ‘वर्क ऑर्डर’चा जन्म आणि श्रेयनामा
दीड वर्ष हा ‘शुक्राचार्य कोण?’ हा खेळ चालला. भाजपवाले मविआकडे बोट दाखवत होते, मविआवाले भाजप आमदारांनाच ‘खलनायक’ ठरवत होते.
…आणि अचानक, दिवाळीचे फटाके फुटून शांत होताच, माझ्या ‘वर्क ऑर्डर’चा जन्म झाला!
सगळ्यात आधी आमदार राणा पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन पेढे वाटले. “मी केलं! मी जनतेचे ६० कोटी वाचवले! आता बघा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या भूमिपूजनाला येतील!” (पण दीड वर्ष उशीर का झाला, या प्रश्नावर त्यांनी ‘मौनाचा’ दुसरा मंत्र मारला).
तेवढ्यात मविआवाले धावत आले. “खोटं! सगळं खोटं! आम्ही उपोषणं केली म्हणून हे शहाणपण सुचलं. निवडणुका आल्या ना तोंडावर? कोणत्या तोंडाने मतं मागणार होतात? आणि तो ‘मर्जीवाला’ गुत्तेदार फायनल झाला वाटतं?”
क्लायमॅक्स: आता माझं काय होणार?
तर मंडळी, मी जन्माला तर आलोय (कागदावर). पण मला भीती वाटतेय. दिवाळी संपली, पण आता ‘नगरपालिका निवडणुकीचे’ फटाके वाजणार आहेत.
हे सगळे ‘श्रेयवीर’ माझ्या उद्घाटनाला रिबीन कापायला नक्की भांडणार. एकजण म्हणेल ‘मी नारळ फोडणार’, दुसरा म्हणेल ‘मी कुदळ मारणार’.
माझी एकच प्रार्थना आहे, “बाबांनो, तुमचा शुक्राचार्य कुणीही असो, मला आता तरी खरोखर जन्माला येऊ द्या. नाहीतर निवडणुकीची आचारसंहिता लागेल आणि मला परत कुणीतरी ‘स्थगिती’ मंत्र मारून फायलीत झोपायला पाठवेल!”
मी वाट पाहतोय… तुमच्या सेवेत रुजू होण्यासाठी.
- आपलाच (अडकलेला)१४० कोटींचा रस्ता.






