धाराशिव: बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथे एका डॉक्टरने आपल्या मूळ पदवीपेक्षा वेगळीच (एमबीबीएस) पदवी लावून रुग्णांची दिशाभूल केल्याचा आणि चुकीच्या उपचारांमुळे एका तरुणाचा जीव धोक्यात घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर बेंबळी पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात फसवणूक आणि हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. सुधीर मुरलीधरराव झिंगाडे (रा. बेंबळी) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेंबळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सखाराम पवार यांनी फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीतील नमूद घटना १ जून २०२५ रोजी घडली. तक्रारदार आकाश गोरोबा चव्हाण (रा. रुईभर) हे पोटात दुखत असल्याने उपचारासाठी डॉ. झिंगाडे यांच्या बेंबळी येथील दवाखान्यात गेले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना मुतखडा असल्याचे सांगून औषधोपचार केले, सलाईन लावले आणि अनावश्यक स्टेरॉईड्सची इंजेक्शन्स दिली. मात्र, घरी परतल्यावर आकाश यांना जास्त त्रास होऊ लागला.
त्यानंतर त्यांना धाराशिव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे केलेल्या सोनोग्राफी आणि सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या स्वादुपिंडावर सूज (Pancreatitis) असल्याचे आणि बाजूला पाणी झाल्याचे निष्पन्न झाले. चुकीच्या उपचारांमुळे आकाश चव्हाण यांना ३ जून ते ११ जून या कालावधीत रुग्णालयात भरती होऊन जीवघेण्या त्रासाला सामोरे जावे लागले.
चौकशीत धक्कादायक बाबी उघड:
या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञांच्या समितीने सखोल चौकशी केली. या चौकशीत खालील गंभीर बाबी समोर आल्या:
१. डॉ. झिंगाडे यांच्याकडे बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार वैध प्रमाणपत्र नाही.
२. त्यांची पदवी D.M & S असताना त्यांनी प्रिस्क्रिप्शन पॅडवर MBBS अशी पदवी लावून तोतयागिरी केली.
३. त्यांनी रुग्णाला अनावश्यक स्टेरॉईड्सचे इंजेक्शन दिले, जे घातक ठरले.
४. एमएमसी (MMC) रजिस्ट्रेशनचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यवसाय केला.
गुन्हा दाखल:
शासकीय समितीच्या अहवालानंतर, डॉ. सुधीर झिंगाडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(३), ३३६(३), ३४०(२), १२५(अ)(ब) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ आणि महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट अन्वये बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर करत आहेत.






