उमरगा: “आमच्या कामात गोंधळ का घालता?” असे विचारल्याच्या किरकोळ कारणावरून ९ जणांच्या टोळक्याने एका बिअर बारच्या मॅनेजरला बेदम मारहाण करून हॉटेलमध्ये मोठी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील जकेकुर येथे घडली आहे. या तोडफोडीत हॉटेलचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अजित चंद्रकांत पाटील (वय ३० वर्षे) हे जकेकुर चौरस्ता येथील हर्ष बिअर बार अँड फॅमिली रेस्टॉरंट येथे काम करतात. शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जकेकुर येथील रहिवासी असलेले ९ तरुण बारमध्ये आले आणि गोंधळ घालू लागले. यावेळी मॅनेजर अजित पाटील यांनी त्यांना “गोंधळ का करता?” अशी विचारणा केली.
याचा राग मनात धरून आरोपी अजय बिराजदार, धनराज उर्फ अंकल बिराजदार, ओमकार सावंत, दत्ता सुभाष काळे, कमलाकर टिम्या पांचाळ, विठ्ठल पवार, गोविंद व्यंकट गिरी, शोयब पटेल आणि धिरज जाधव यांनी अजित पाटील यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. इतक्यावरच न थांबता या टोळक्याने हॉटेलमधील दारुच्या बाटल्या फोडल्या आणि मुख्य दरवाजासह खिडक्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले.
या घटनेनंतर अजित पाटील यांनी शनिवारी, दि. २० सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.