कळंब – व्यवसायातून बेदखल करणे आणि जमिनीच्या वादातून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ४८ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पाच नातेवाईकांविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिम हबीब सय्यद (वय ४८, रा. जायफळ, ता. कळंब, ह.मु. सदगुरु नगर, भोसरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी गुलशन अजिम सय्यद (वय ४५) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिम सय्यद यांचा ‘पुना इंटरप्राइजेस’ नावाचा रोलिंग वर्कचा व्यवसाय होता. मात्र, काही नातेवाईकांनी त्यांना २०१७ पासून या व्यवसायातून परस्पर बेदखल केले होते. याशिवाय, मयत अजिम यांच्या नावावर असलेली वडिलोपार्जित जमीन विकण्यास त्यांचे भाऊ विरोध करत होते. जमिनीच्या विक्रीवरून त्यांना मारहाण करून मानसिक त्रास दिला जात होता.
हा त्रास असह्य झाल्याने अजिम सय्यद यांनी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी आत्महत्या केली. या सर्व त्रासाला त्यांचे नातेवाईक जबाबदार असल्याचे पत्नी गुलशन सय्यद यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी अहमद राजेसाब शेख, रजिया अहमद शेख (रा. सदगुरु नगर, भोसरी, पुणे), भावजय इलाई हबीब सय्यद, पुतणे रेहान इलाही सय्यद आणि शोएब इलाही सय्यद (सर्व रा. जायफळ, ता. कळंब) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३२३ (मारहाण) आणि ३४ (समान उद्देशाने गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.