धाराशिव – धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आज खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय विद्यालय स्थापनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या धाराशिवसाठी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
धाराशिवसारख्या जिल्ह्यात, जिथे केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण देणारे केंद्रीय विद्यालय असणे अत्यावश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांनाही या सुविधेचा मोठा लाभ होणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी आवश्यक जागेची निवड, प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया आणि संबंधित प्रशासकीय कामकाज कसे गतीमान करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालय स्थापनेच्या दिशेने प्रत्यक्ष हालचालींना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत सकारात्मक घडामोड ठरणार आहे.