तुळजापूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिवरी महालक्ष्मी मंदिराच्या रस्त्याची दुरुस्ती रामभरोसे सोडण्यात आली आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून जबाबदारी झटकली असून, प्रशासनही याकडे कानाडोळा करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यात्रेस अवघे बारा दिवस शिल्लक असताना देखील ठेकेदाराने दुरुस्तीच्या कामाला हातही लावलेला नाही.
साईड पट्ट्यांचा दिखावा, मुख्य रस्त्याची अवस्था जैसे थे!
गेल्या महिन्यात झांबरे वस्ती ते साठवण तलाव दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याने काही दिवसांतच रस्त्याची दयनीय अवस्था झाली. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदाराने फक्त साईड पट्ट्या भरून दिखावा केला असून, मुख्य रस्त्याची दुरवस्था जैसे थे आहे.
ठेकेदाराला अभय कोणाचे? आंदोलनाचा इशारा!
ठेकेदार प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत निर्धास्त बसला आहे. त्यामागे कोणत्या मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद आहे? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. यात्रेच्या तोंडावरही दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
भाविकांचा जीव धोक्यात – जबाबदारी कोणाची?
चिवरी महालक्ष्मी यात्रेच्या काळात हजारो भाविक या रस्त्याने प्रवास करतात. जर या दुरवस्थेमुळे एखादा गंभीर अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल ग्रामस्थ आणि भाविक विचारत आहेत. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून रस्ता दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.