धाराशिव: छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चोराखळी येथील एका डान्सबारसमोर सोमवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात संदीप यल्लाप्पा गुट्टे (वय ४०) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जुन्या वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येरमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील चोराखळी येथील धाराशिव कारखान्याजवळ असलेल्या ‘कालिका नाट्यगृहा’ समोर रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी एक डान्सबार चालवला जातो. संदीप गुट्टे हे आपला मित्र अरुण जाधव यांच्यासोबत याठिकाणी आले होते. नाट्यगृहाबाहेर असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली, ज्यात ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी गुट्टे यांचा मित्र अरुण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गुट्टे आणि अक्षय साळुंके यांच्यात जुने भांडण होते. याच वादातून अक्षय साळुंके आणि त्याच्या साथीदारांनी संदीप गुट्टे यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Video