तुळजापूर – तुळजापूर शहर आणि परिसरात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध विक्री व तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा आरोप करत, एका नागरिकाने थेट पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिजामाता नगर, तुळजापूर येथील रहिवासी प्रशांत दत्तात्रय कांबळे यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये हे निवेदन सादर केले आहे. त्यांच्या अर्जानुसार, शहरातील पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमधून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे.
कांबळे यांनी आपल्या अर्जात गुटखा तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट मार्गांचा उल्लेख केला आहे. यामध्ये बार्शी-तुळजापूर, कळंब-तुळजापूर, धाराशिव-तुळजापूर, उमरगा चौरस्ता-लोहारा ते तुळजापूर, कोंड ते तुळजापूर, अणदूर ते तुळजापूर, मुरुम ते तुळजापूर आणि सलगरा ते तुळजापूर या रस्त्यांवरून वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे म्हटले आहे. या अवैध धंद्यांमुळे सामान्य जनतेची लूट होत असून गुंडगिरी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
संशयित तस्करांची नावे उघड:
विशेष म्हणजे, कांबळे यांनी आपल्या अर्जात गुटखा तस्करी करणाऱ्या काही संशयितांची नावेही दिली आहेत. यात राम डोंबे (बार्शी), बबु शेख (बीड), आबासाहेब मुळे (बीड), शाहरुख शेख (अणदूर), शिवराज उर्फ शिवाजी बोकडे (बेळंब , मुरुम), आप्पा कोरे (कोंड), रमेश मालपाणी (कळंब) आणि दादासाहेब सलगरे (सलगरा) यांचा समावेश असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उपोषणाचा इशारा:
जर प्रशासनाने या अवैध धंद्यांवर आणि तस्करीवर तात्काळ धाडी टाकून कारवाई केली नाही, तर दि. २५ ऑगस्ट २०२५ पासून तुळजापूर पोलीस स्टेशनसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रशांत कांबळे यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांनाही देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे आता पोलीस आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.