वाशी – भूम तालुक्यातील आंद्रुड गावात दरवर्षीप्रमाणे आयोजित दोन दिवसीय यात्रेनिमित्त काल, शुक्रवारी (११ एप्रिल) सायंकाळी कुस्ती स्पर्धेदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून मोठा राडा झाला. एका तरुणाने पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावल्याने संतप्त झालेल्या घायवळ व त्याच्या १५-१६ साथीदारांनी मिळून त्या तरुणाला दगड, मातीच्या ढेकळांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
याप्रकरणी, कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी भगवान गोरख टिकोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, निलेश घायवळ (मूळ गाव रा.सोनेगाव , ता. जामखेड, जि. अहिल्यानगर ), चापट मारलेल्या सागर मोहळकर ( रा. जामखेड ) आणि घायवळच्या अंदाजे १५ ते १६ अनोळखी साथीदारांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४(२) अन्वये सार्वजनिक ठिकाणी दंगल करून शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
आंद्रुड गावात १० आणि ११ एप्रिल रोजी जगदंबा देवीची वार्षिक यात्रा होती. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावात ज्ञानेश्वर गिते आणि लिंमकर असे दोन राजकीय गट असून त्यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याने यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, ज्यात आर.सी.पी. प्लाटूनचाही समावेश होता. फिर्यादी पोलीस कॉन्टेबल भगवान गोरख टिकोरे व त्यांचे सहकारी पोहेकॉ/१०३४ कुटे हे बंदोबस्तासाठी आंद्रुड गावात पायदळ गस्त घालत होते.
सायंकाळी सुमारे ७:४५ वाजता, पोलीस कॉन्टेबल टिकोरे व कुटे हे कुस्तीच्या आखाड्यापाशी आले असता, त्यांनी पाहिले की तीन काळ्या स्कॉर्पिओ गाड्यांमधून निलेश घायवळ व त्याचे १५-१६ साथीदार (बाउन्सर) उतरले. निलेश घायवळ यास आयोजक ज्ञानेश्वर गिते यांनी स्टेजजवळ नेले. मात्र, घायवळ स्टेजवर न जाता थेट कुस्तीच्या आखाड्यात गेला व आयोजकांशी हस्तांदोलन करत फिरू लागला. त्याचवेळी, काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला व डोक्यावर टोपी घातलेला सागर मोहळकर हा तरुण धावत आला आणि त्याने अचानक निलेश घायवळ याच्या डाव्या कानशिलात जोरात चापट मारली.
या प्रकारानंतर निलेश घायवळने इशारा करताच त्याच्यासह आलेल्या १५-१६ साथीदारांनी सागर मोहळकर याला खाली पाडून दगड, मातीची ढेकळे आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत मोहळकर याच्या डोक्याला जखम होऊन रक्त येऊ लागले.
पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप
हा प्रकार पाहताच पोलीस कॉन्टेबल टिकोरे, पोहेकॉ कुटे आणि सोबतच्या आर.सी.पी. प्लाटूनच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन जखमी सागर मोहळकर याला घायवळ व त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी पोलिसांच्या मागेही धाव घेतली, ज्यामुळे आखाड्यातील लोक घाबरून पळून गेले. पोलिसांनी जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत निलेश घायवळ , सागर मोहळकर (जो जखमी असूनही पळून गेला) आणि त्यांचे साथीदार पसार झाले होते.
पोलीस निरीक्षक थोरात यांना घटनेची माहिती मिळताच तेही ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत जखमी तरुणाचे नाव सागर मोहळकर असल्याचे समजले. फिर्यादीकॉन्टेबल टिकोरे यांच्या तक्रारीवरून निलेश घायवळ , जखमी सागर मोहळकर आणि घायवळ यांच्या १५- १६ अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, वाशी पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपी सध्या फरार आहेत.
Video