परंडा: ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचाराची तक्रार केल्याच्या रागातून आणि रस्त्यावर गाडी लावल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना परंडा तालुक्यातील आसू येथे घडली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना (भ्रष्टाचाराची तक्रार):
भारत भीमराव जाधव (वय ४५, रा. आसू) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी आसू ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार केली होती. याचा राग मनात धरून चतुर्भुज अर्जुन जाधव, गणेश चतुर्भुज जाधव, विकास गहिनीनाथ जाधव आणि अविनाश जाधव यांनी दिनांक १५ डिसेंबर रोजी रात्री ११ ते १६ डिसेंबर रोजी सकाळी ८:४५ च्या सुमारास त्यांना शिवीगाळ केली. यावेळी आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
दुसरी घटना (गाडी लावल्याचा वाद):
दुसऱ्या गटाकडून चतुर्भुज अर्जुन जाधव (वय ६५, रा. आसू) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी भारत भीमराव जाधव, मयूर भारत जाधव आणि रोहन भारत जाधव यांनी ‘वाटेवर गाडी लावून का थांबलात’, असे विचारल्याच्या कारणावरून वाद घातला. यावेळी आरोपींनी चतुर्भुज जाधव यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.
दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.






