धाराशिव : शहरातील शम्स चौकात कलिंगडाच्या पैशांच्या कारणावरून वाद उफाळून आला आणि तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एका युवकाला गंभीर दुखापत झाली असून, धाराशिव शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बागवान ताहेर रसुल (वय 24 वर्षे, रा. शम्स चौक, मर्चंट फंक्शन हॉल समोर, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 19 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता शम्स चौक मर्चंट फंक्शन हॉलसमोर कलिंगडाच्या पैशांच्या कारणावरून वाद झाला.
यावेळी आरोपी अदिल अखलाख शेख, सुलेमान अखलाख शेख आणि अखलाख शेख (सर्व रा. शम्स चौक, धाराशिव) यांनी बागवान ताहेर रसुल यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपींनी जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी बागवान ताहेर रसुल यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी भा.न्या.सं.कलम 117(2), 118(2), 115(2), 352, 351(2) 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत असून, हाणामारीमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मुळेवाडीत रस्ता वादावरून तुंबळ हाणामारी, एक जण गंभीर जखमी
धाराशिव : मुळेवाडी येथे रस्ता वादावरून झालेल्या तुंबळ हाणामारीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. वादाचे कारण तहसीलदारांकडे रस्त्याच्या अर्जाची तक्रार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ढोकी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
प्राप्त माहितीनुसार, उत्रेश्वर प्रभु वराळे (वय 39 वर्षे, रा. मुळेवाडी, ता. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.15 वाजता शेत गट क्रमांक 150, मुळेवाडी येथे रस्त्याच्या अर्जासंदर्भात तहसीलदारांकडे दिलेल्या अर्जाच्या कारणावरून आरोपींनी हल्ला केला.
आरोपी प्रविण वसंत वराळे (वय 32), नारायण ज्ञानोबा वराळे (वय 62), सुनिल नारायण वराळे (वय 33) आणि प्रेमचंद हिराचंद वराळे (वय 27) या चौघांनी एकत्र येऊन उत्रेश्वर वराळे यांना कुर्हाड, काठ्या व लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.
यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या किशोर धावारे यालाही आरोपींनी शिवीगाळ करीत मारहाण केली. घडल्या प्रकाराची कोठे तक्रार केली तर जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
उत्रेश्वर वराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 307, 326, 324, 447, 450, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील तपास ढोकी पोलीस करीत आहेत.
फौजदारी एमए क्रमांक 59/24 अंतर्गत मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. 1 उस्मानाबाद यांनी जाक्र 1265/25 दि. 13.03.2025 रोजी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधिक तपास करीत आहेत. गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी सुरक्षेची व्यवस्था कडक केली आहे.