धाराशिव – जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याबद्दल दोन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
तुळजापूरचे अभिजीत राजेंद्र माने यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक करून मारहाण करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक गणेश श्रीपतराव झिंजुरडे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, तत्कालीन पोलीस अधिक्षक अतुल विलास कुलकर्णी आणि सध्याचे पोलीस अधिक्षक संजय यशवंतराव जाधव यांनी दीड वर्षे झाले तरी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही.
२०२० मध्ये झालेल्या या घटनेत माने यांना पोलिसांनी अटक करून मारहाण केली होती. माने यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. या प्रकरणी झिंजुरडे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, परंतु कुलकर्णी आणि जाधव यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
याचिकेत म्हटले आहे की, पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा करून न्यायालयाचा अवमान केला आहे. 1 या प्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांना शिक्षा आणि दंड करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने आजी आणि माजी एसपीना याप्रकरणी नोटीस बजावली आहे.